वृक्षारोपण


वृक्षारोपण

 
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) झाडांचे जतन व  संरक्षण  अधिनियम १९७५ चे प्रकरण ४ वृक्ष प्राधिकरणाची  कर्तव्येमध्ये  कलम ७ (ज) (झ) नुसार वृक्षारोपणाबाबत उद्दिष्ट साध्य  करण्यासाठी योजना  हाती घेणे सूचित केले असून त्या अनुषंगाने वृक्ष प्राधिकरण मार्फत ५ लक्ष वृक्षलागवड योजना प्रथमतः सन २०१५ मध्ये चालू करण्यात आली . 

 

सन  २००२-२००३ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षगणनेनुसार ठा. म. पा. हद्दीमध्ये ३३१५०० वृक्षांची नोंद  झाली  असून सन  २०१०-११ मध्ये झालेल्या  वृक्षगणनेनुसार ४५५०७० वृक्षांची  नोंद  झालेली  आहे. सदरची आकडेवारी पाहता ठाणे शहरातील वृक्षांच्या  संख्येमध्ये  मोठ्या  प्रमाणात  वाढ  करण्याची  गरज  आहे. 

 

सन  २०१५-१६ या सन २०१७-१८ मध्ये ५ लक्ष  वृक्षलागवड योजना  राबवण्यासाठी ठराव क्र २५ दि . २४/०४/२०१५ अनव्ये  मा. वृक्षप्राधिकरण  सभेची मान्यता घेण्यात आलेली आहे. तसेच  मा. वृक्षप्राधिकरण ठराव  क्र. ६८ दि . ०३/०७/२०१५ अनव्ये  मा. महासभेची  मान्यता घेण्यात आलेली आहे. तसेच  ठराव क्र. ३९७ दि. १३/०८/२०१५ अनव्ये  मा.  स्थायी  समितीची  मान्यता  घेण्यात आलेली आहे.

ठाणे महानगरपालिका, वृक्ष  प्राधिकरणामार्फत ५ लक्ष  वृक्ष  लागवड योजनेचा शुभारंभ दि. ५ जून  २०१५ रोजी जागतिक पर्यावरण  दिनाचे  औचित्य  साधून संपन्न झालेला आहे. या वृक्षलागवडीच्या  धोरणामध्ये सेवाभावी संस्था, प्रायोजक  व  विकासक  तसेच  इतर  संस्थेमार्फत  सन २०१५-२०१६ मध्ये अंदाजे  ४९६३८ वृक्षारोपण करण्यात आले असून या वर्षात पावसाचे प्रमाण  कमी झाल्याने  वृक्षारोपणाची  संख्या  मर्यादित  राहिली आहे.

 

सन  २०१६-१७ मध्ये  महाराष्ट्र  शासनाने १ जुलै २०१६ या कृषी दिनी राज्यभरात  एकाच  दिवशी  २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घोषित केले होते. या उपक्रमामध्ये त्रिपक्षीय  करारनाम्याद्वारे मौजे  मुंब्रा -शीळ येथील  वन विभागाच्या प्राप्त  झालेल्या  जागेवर वन विकास महामंडळ या वन विभागाच्या  संस्थेमार्फत लक्ष  वृक्ष लागवडीच्या  उद्दिष्टापैकी १ जुलै २०१६ या एकाच  दिवशी ६००३० वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ता दुतर्फा , मैदाने , मोकळ्या  जागा, आरक्षित  भूखंड, खाजगी गृहसंकुल , सार्वजनिक  उद्याने व  विकासकांचे क्षेत्र  इत्यादी  जागेवर १०४३९ वृक्षारोपण असे  एकाच दिवशी एकूण ७६४६९ वृक्षलागवडीचे  उद्दिष्ट साध्य  करण्यात  आले. शासनाच्या  २ कोटी वृक्षलागवड उपक्रमा अंतर्गत  होणाऱ्या वृक्षारोपणामध्ये  किमान २७ सेवाभावी  संस्थांचे अंदाजे १०००० सदस्य  तसेच शालेय, महाविद्यालयीन व स्काऊट गाईड असे २००० विध्यार्थी  सहभागी झालेले  होते.  ठाणे महानगरपालिकेच्या  वर्धापनदिनी  दि  १ ऑक्टोबर २०१६ रोजी एकाच दिवशी १०००० वृक्ष लागवडीचे  नियोजन  करण्यात  आले होते. या वृक्षरोपण मोहिमे अंतर्गत सुमारे ११५०० वृक्षांची  लागवड करण्यात आली. सन  २०१५ ते २०१६ या २ वर्षाच्या  कालावधीत एकूण सुमारे २१०६७३ वृक्षारोपणाचे  उद्दिष्ट  साध्य  केले आहे. सदर वृक्षांचे Geo-Tagging करून त्या बाबतची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सर्व नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात अलेली  आहे. 

 

वृक्षलागवडीबाबत  " महाराष्ट्र शासनाने ५० कोटी वृक्षलागवड धोरण योजना"  घोषित केली असून याबाबत प्रस्थावित  सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५ लक्ष वृक्षलागवड योजनेमधील उर्वरित ३ लक्ष वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. 

 

मे.  विभागीय  संस्थापक, वन प्रकल्प  विभाग, ठाणे हे महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ या महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून सदर महामंडळाकडून ठा.म.पा  ५ लक्ष  वृक्षलागवड  योजनेमध्ये सन २०१६-१७ मध्ये १ लक्ष वृक्ष लागवड व निगा देखभाल व  सन २०१७-१८ मध्ये २  लक्ष वृक्ष लागवड व निगा देखभालीचे काम पुढील ४ वर्ष (सन २०२०-२१ पर्यंत)  करण्याचे नियोजन  केले आहे.